Description
श्रीमद्भगवद्गीतेचा आधार भारतीय मनाला केवढा आहे, हे का सांगायला हवे? श्रीमद्भगवद्गीतेतील जीवनदर्शनातून अनुभवातून माणसे जाणती आणि जागे होण्याच्या बिंदूवर येतात. मग मूलगामी परिवर्तनाच्या दिशेने आपण वाटचाल करायला लागतो. आपली वाट उजळून आपल्या जाणिवा विस्तारतात, पूर्णपणे बदलतात. श्रीमद्भगवद्गीतेतील शिकवण परिपूर्ण असून, ती हिंदू हृदयालाच नव्हे, तर मानवी अस्तित्त्वालाच व्यापून उरते. विशेषतः दुसऱ्या अध्यायाच्या आस्वाद-अनुभवातून करुणा, चेतना आणि तेज यांचा एक पवित्र अनुभव आपल्याला मिळत जातो. दुसऱ्या अध्यायातील जीवनवैभवाचे समग्र रूप, जीवनार्थ तसेच त्यातील (मोजक्याच) श्लोकांचे आस्वादन शब्दात पकडण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. भगवद्गीतेतील दुसरा अध्याय हा अवर्णनीय, अस्फुट आणि विशुद्ध, दैनंदिन मानवी (चरितार्थाच्या) जीवनगतीत वाट्याला येणाऱ्या नैराश्य-घालमेल-तडफड यांच्या पार पलीकडे आपल्याला घेऊन जातो. दुसऱ्या अध्यायात एक खुलेपणा आहे, पारदर्शकता आहे. तसेच जीवनाच्या सातत्याचे म्हणजे आत्म्याच्या अमरत्वाचे, कर्मयोगाचे तसेच कर्मकौशल्याचे दिग्दर्शन आहे. स्थिरबुद्धी-स्थितप्रज्ञ माणसाची श्रीकृष्णाने कथन केलेली लक्षणे अवर्णनीय व अफलातून आहेत. इतकेच नाही तर, ही दिव्यत्वाची अनुभूती आपल्याला एका निवृत्तिशील विरागी मनाकडे घेऊन जाते. माणसाच्या जाणिवेत मूलभूत परिवर्तन जोवर होत नाही, तोवर मानसिक ताणतणाव, संघर्ष आणि दुःख यांचे सावट मानवी जीवनावरून दूर होणार नाही. अपुऱ्या इच्छा-कामनेतून क्रोधाकडे, क्रोधाकडून मूढ़ता-अविचाराकडे तसेच मूढतेकडून बुद्धीच्या म्हणजे ज्ञानशक्तीच्या नाशाकडे पर्यायाने अधःपतनाकडे आपण जाऊ लागतो. म्हणूनच इच्छा संयमित करुन कामना तसेच आसक्ती, ममत्व आणि अहंकार यांचा जर आपण मोठ्या सजगतेने त्याग केला, तरच अनंतमयी शांततेच्या जीवनदृष्टीचा आपल्याला लाभ होऊ शकेल, असा भगवान श्रीकृष्णाचा सांगावा आहे.
Reviews
There are no reviews yet.